वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील ‘केळेवाडी' गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबईचे निवृत्त संचालक डॉ.मुरहरी केळे यांनी लिहिलेल्या ‘एडका' या आत्मचरित्राला नुकताच सोलापूर येथील जेष्ठ लेखक आणि कवि गोविंद काळे प्रतिष्ठान तर्फे त्यांचे वडील कै.ज्ञानोबा बापू काळे यांच्या नावाने राज्यस्तरीय उत्कृष्ट वांग्मय निर्मितीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे स्वरूप 5 हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पहार असे असून तो देऊन लेखकाचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ.मुरहरी केळे हे उच्चविद्याविभूषित व जेष्ठ उर्जातज्ञ असून संत साहित्य व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनाअभ्यास करणारे एक प्रसिद्ध लेखक आहेत.त्यांच्या नावावर ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर', ‘संतवाणी', ‘मी एम.एस.' हे तीन संपादित ग्रंथ असून, त्यांनी त्यांच्या वडिलांच्यावर लिहिलेले चरित्र ‘जगी ऐसा बाप व्हावा' आईचे चरित्र ‘नानी', ललित लेखसंग्रह ‘शब्दशिल्प' व नुकतंच प्रकाशित झालेले ‘एडका' हे आत्मचरित्र, अशी मराठी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या प्रत्येक ग्रंथाची मराठी साहित्य क्षेत्राने दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे ‘जगी असा बाप व्हावा' हे पुस्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात असून, त्या ग्रंथाचे मराठी व इंग्रजी मध्ये भाषांतर झालेले आहे.
याव्यतिरिक्त डॉ.केळे यांनी तीन इंग्रजी ग्रंथ लिहिले असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. डॉ.केळे यांनी नुकताच ‘निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास' या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शोधप्रबंध सादर केला आहे. सदरचा पुरस्कार भारत माता ज्ञानपीठातर्फे विटा येथे आयोजित 9 फेब्रुवारीला 43 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व कवी संमेलनाध्यक्ष आनंदहरी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. असे गोविंद काळे व संमेलनाचे संयोजक रघुनाथ मेटकरी यांनी कळवले आहे.