उमरगा -  धाराशिव जिल्ह्यात महिन्यांपासून वारंवार दिसून आलेल्या वाघाने उमरगा तालुक्यातील जेकेकुर शिवारात एन्ट्री केल्याच्या चर्चेने नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. जकेकूर-येळी शिवारात बुधवारी रात्री नागरिकांना वाघ दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे  वन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. 


धाराशिव जिल्ह्यात येडशीसह विविध गावांत वाघ दिसुन आल्याची चर्चा आहे. दोन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात मुक्काम ठोकलेल्या वाघाने आता 'नव्या प्रवासाला' सुरुवात केली आहे. आधी रामलिंग अभयारण्य, मग बार्शी सीमेवर आणि आता थेट उमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारात आढळून आल्याची चर्चा आहे. ग्रामसेवक लक्ष्मण जकेकुरे हे आपल्या कारने बुधवारी रात्री सोलापूरवरून येत असताना जकेकूरवाडी पाटीजवळून वाघ बलसूर शिवारात गेल्याचे सांगतात. याबाबत त्यांनी येळी गावचे उपसरपंच रामलिंग बिराजदार यांना कळविले. तसेच इतर काही जणांनी ही वाघ दिसल्याचा दावा सोशल मीडियावर केल्याने वनविभागाच्या टीमने रात्री दहा-अकराच्या सुमारास जकेकूर शिवारात सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर वनविभागाने गुरुवारी परत सकाळपासून त्याभागात शोध कार्य सुरू केले.


याबाबत वन परिमंडळ अधिकारी मुक्ता गुट्टे यांनी सांगितले की, आम्ही त्या भागात शोध कार्य सुरू केले असून वाघ असल्याचे पुरावे मिळतात का? याची पाहणी करत असून नेमका कोणता प्राणी आहे हे ठसे मिळाल्यानंतर समजणार आहे. यापूर्वी या भागात तरस हा प्राणी आढळलेला असून तो दुरून वाघासारखा दिसतो. वाघ आल्याच्या चर्चाने मात्र येळी, जकेकूर, जकेकुरवाडी, औराद, भुसणी, बलसुर आदी गावासह तालुक्यातील नागरिक दहशतीत आहेत.


 
Top