धाराशिव - लाडकी बहीण, ज्येष्ठ नागरिक व इतर काही योजनांच्या सवलतीमुळे एसटी महामंडळास दररोज तीन कोटी रुपयांचा तोटा होत आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सर्व बसेसना सवलत देता येत नाही, असे स्पष्ट मत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
धाराशिव येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया'च्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच कार्डचे वितरण पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. पत्रकारांच्या विविध मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगून सरनाईक म्हणाले, रुग्णांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरणाची 72 तासांत चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळस व इतर कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील आदिवासी भागात एसटी सेवा पोहोचावी, यासाठी ‘एसटी तेथे एसटी' ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकशाहीसाठी पत्रकारांच्या निर्भीड भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने न देता,त्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांनी पाठपुरावा करावा, आवाहन त्यांनी केले.
आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांसाठी अपघात विमा सुरक्षा कवच सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विकासासंदर्भात लोकप्रतिनिधी अनेक घोषणा करतात. त्यांना पत्रकारांनी जाब विचारण्याचे आवाहन करत, शेतमालाला हमीभाव, 23 टीएमसी पाणी प्रकल्प, मेडिकल कॉलेजची सद्यस्थिती यासंबंधी प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात 205 पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच वितरित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, नितीन लांडगे, सुधीर पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, राज्य कार्यवाह अमर चोंदे, पोस्ट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक चंद्रकांत झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार मल्लिकार्जुन सोनवणे यांनी मानले.