तुळजापूर - ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दिल्याचा कारणावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी पुजारी मंडळाच्या अध्यक्षांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला तुळजापूर शहरवासियांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यावेळी ड्रग्ज तस्करीच्या म्होरक्यावर कारवाई करण्यात यावी, शहरातील ड्रग्स प्रकरणाची निःपक्षपाती व सक्षम यंत्रणेकडून चौकशी व्हावी, शहरातील मंदिरात वाढलेल्या चोऱ्या, दरोडे, लूट करणाऱ्यावर कारवाई करावी, अवैध धंद्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अमोल कुतवळ, ऋषीकेश मगर, श्याम पवार, उत्तम अमृतराव, अमर परमेश्वर, नागनाथ भांजी, रवि साळुंके, किशोर गंगणे, प्रा. धनंजय लोंढे, महेश चोपदार, सुनिल जाधव, अविनाश गंगणे, विजय भोसले, किरण अमृतराव, सचिन अमृतराव, आलोक शिंदे, सागर कदम, सुभाष कदम, गुड्डू कदम, श्रीकांत धुमाळ, कालिदास नाईकवाडी, संभाजी भांजी यांच्यासह शहरवासीय उपस्थित होते. उपोषण आंदोलनास महाविकास आघाडी, महायुती, विविध सामाजिक संघटना व पत्रकार संघाच्या सदस्यांनी पाठींबा दिला.
दरम्यान तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर ड्रग्ज व अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करुन शहरास स्वतंत्र शहर पोलिस स्टेशन निर्माण करण्याची ग्वाही दिली. नायब तहसिलदार संतोष पाटील यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले.