उमरगा (प्रतिनिधी)- कराळी येथील आगज्याप्पा देवस्थान गुरूकुलातील विद्यार्थ्यांना गावातील समाजकंटक, गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी 27 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान तलवार व हंटरचा धाक दाखवून गळा दाबून अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर 28 जानेवारीला अमोल भरत जमादार आणि नागराज बापु जमादार यांच्या विरूध्द पोलीसांत गुन्हा दाखल होवून सात दिवस झाले तरी आरोपींना अटक नाही. आरोपी मोकाट असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी दि 03 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले.

तहसीलदार गोविंद येरमे यांना कराळी ग्रामस्थ व भक्त गण तसेच वारकरी आगज्याप्पा देवस्थान तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास आगज्याप्पा देवस्थानाच्या गुरुकुलातील विद्यार्थी आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मण कदम यांना समाज कंटक, गुंड प्रवृतीचे इसम अमोल जमादार, नागराज जमादार यांनी तलवार, हंटरचा धाक दाखवून, गळा दाबून अमानुष मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे देवस्थान गुरुकुलातील विद्यार्थी यांचे शिक्षण घेणे व गुरुकुलात राहणे धोक्याचे झाले आहे. 

याबाबत 28 जानेवारी रोजी पोलीस ठाणे येथे विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे. सदरचा गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी अमोल व नागराज हे फरार असून गुरुकुलातील विद्यार्थी तुरोरी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी ये जा करत असताना अमोल याचा भाऊ सचिन जमादार, नातेवाईक जीवे मारण्याची धमकी दाखवून गुन्हा काढून घेण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे गुरुकुलातील सर्वच विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांचे जिविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे विद्यार्थी, विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top