धाराशिव (प्रतिनिधी) - वाहन खरेदीसाठी कर्ज घेवून कर्ज परतफेडीसाठी धनादेश देवून तो अनादरीत करणाऱ्या आरोपीस धनादेशाच्या दुप्पट नुकसान भरपाई, तीही 9 टक्के व्याजदराने फिर्यादी समृध्दी मल्टीस्टेटला अदा करण्याची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कामत यांनी सुनावली आहे. तसेच ही भरपाई न दिल्यास साध्या कारावास आरोपीस भोगावा लागणार आहे.
धाराशिव येथील समृध्दी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीकडून दारफळ येथील कर्जदार आरोपी राजेंद्र रामभाऊ इंगळे याने वाहन खरेदीसाठी एप्रिल 2019 मध्ये 4 लाख 59 हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्याचे कर्ज थकबाकीत गेल्यानंतर त्याने कर्ज परतफेडीसाठी 1 लाख 90 हजारांचा धनादेश सोसायटीच्या हक्कात दिला होता. परंतु हा धनादेश अनादरीत झाला. त्यामुळे सोसायटीने न्यायालयात धाव घेत आरोपी इंगळे याच्याविरूध्द फिर्याद दाखल केली. प्रकरणाच्या सुनावनीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. कामत यांनी आरोपी राजेंद्र इंगळे याने फिर्यादी सोसायटीस धनादेशाच्या दुप्पट रक्कम म्हणजेच 3 लाख 80 हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. तसेच या भरपाईची रक्कम वसुल होईपर्यंत फिर्याद दाखल तारखेपासून दरसाल दर शेकडा 9 टक्के दराने व्याजही देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. तसेच ही नुकसान भरपाई न दिल्यास आरोपी राजेंद्र इंगळे यास 6 महिने साधा करावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात फिर्यादी सोसायटीतर्फे ॲड. एन. बी. तपीसे यांनी न्यायालयात बाजू मांडली.