उमरगा (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.2 या योजने अंतर्गत टप्पा क्र. 6 मध्ये रामदरा साठवण तलाव ते एकुरगा पर्यंतच्या बंदिस्त नलिकेच्या मंजुर कामांना प्राधान्यक्रम मिळावे, कामे जलदगतीने व्हावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे केली आहे.


कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.2 या योजनेस 2022 मध्ये द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. सद्या स्थितीत टप्पा क्र.1 ते टप्पा क्र. 5 साठी प्राधान्यक्रम प्राप्त आहे. सदरील टप्यांमधील बहुतांश कामे पुर्ण झालेली आहेत व उर्वरित कामे येत्या सहा महिन्यात पुर्ण होतील असे जलसंपदा विभागाचा आढावा घेतले असता समजते. मंजूर प्राधान्य क्रमातील कामामुळे (उपसासिंचन योजना क्र.2 टप्पा -5 अंतर्गत रामदरा साठवण तलावपर्यंत) एकुण तीन हजार 3784 हेक्टर (34.85 टक्के) सिंचन क्षेत्र निर्मिती होणार आहे. टप्पा क्र. 6 उमरगा व लोहारा तालुक्यातील कामांना अजुन प्राधान्यक्रमात समाविष्ठ नसल्यामुळे कामे सुरु झालेली नाहीत. सद्यास्थितीत प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले सविस्तर सर्वेक्षण आणखी व्हायचे आहे. या कामांचे संकल्पन व रेखाचित्रे बनवण्यासाठी व निविदा प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागणार आहे. तथापि सदर प्रकल्पाअंतर्गत भौगोलिक परिस्थितीनुसार तालुक्यानिहाय समतोल साधण्याकरिता टप्पा क्र. 6 मधील रामदरा साठवण तलाव ते एकुरगा पर्यंतच्या बंदिस्तनलिकेचे काम मंजुर प्राधान्यक्रमातील कामा सोबत हाती घेणे आवश्यक आहे. त्याद्वारे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, लोहारा व उमरगा या तालुक्यातील सात हजार 78 हेक्टर (65.18 टक्के) क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उपसासिंचन योजना क्र. 2 अंतर्गत एकुण 63.44 दलघमी पाणीसाठा व त्याद्वारे दहा हजार 862 सिंचन क्षेत्राची निर्मिती होईल. रामदरा धरणात लवकरच सोडण्यात येणार आहे. परंतु तेथुन पुढे तुळजापूर, लोहारा व उमरगा या भागातील कामे झाले नसल्याने त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होणार नाही. पाणी विनावापर रहाणार आहे. दुष्काळी स्थितीत असलेल्या दोन्ही तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत, त्यासाठी कामे जलद गतीने पुर्ण होणे गरजेचे आहे. टप्पा क्र.6 उमरगा व लोहारा तालुक्याचा प्राधान्यक्रमात समावेश करून निविदा प्रक्रिया जलदगतीने व सलगतेने कामे पुर्ण करण्यचे आदेश देण्याची मागणीही प्रा. बिराजदार यांनी केली.

 
Top