धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर मंदिराचे शिखर ज्या 4 दगडी तुळईवर उभारण्यात आले आहे. त्यापैकी 2 शिळांना आरपार तडे गेल्याची बाब समोर आली. या अनुषंगाने मंदिराचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याच्या अनुषंगाने ही बाब आपण पुरातत्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली. पुढील पंधरवड्यात गाभाऱ्यासह मंदिर दुरुस्तीचा कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बोलावलेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
शुक्रवारी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या मंत्रालयातील दालनात श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. साडेतीन शक्तीपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान असणाऱ्या पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दार कामाचा आढावा घेण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंदिराचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून घेण्यात आले होते. त्याचा अहवालही समोर आला आहे. गर्भगृहासह मंदिराची दुरुस्ती करताना दगडांना नंबर टाकून पूर्ण वास्तू उतरवून परत एकदा तेच दगड वापरत नव्याने जुन्या पद्धतीत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने साकारला जाणार जाणार आहे. या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य मंत्री ना.आशिषजी शेलार यांना बैठक घेण्याबाबत आपण विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी मंत्रीमहोदयांनी या महत्वाच्या विषयावर आपल्या विनंतीला मान देऊन बैठक घेतली. यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव श्रीमती नंदा राऊत, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहने, सल्लागार आफळे आदी उपस्थित होते.
विश्वस्त, पुजारी, अभ्यासक यांचीही होणार बैठक
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून मंदिराचा कळस ज्या 4 दगडी तुळईवर स्थित आहे. त्यापैकी दोन शिळांना पूर्णता तडे गेल्याचे आपण मंत्री शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले. गाभाऱ्याची दुरुस्ती करताना तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीला धोका संभावु शकतो. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवीजीची मूर्ती शास्त्रोक्त पद्धतीने इतरत्र हलविणे आवश्यक आहे. त्यासाठी मंदिराचे प्रमुख व धार्मिक प्रमुख यांची बैठक घेण्याचे ठरले. तसेच दैनंदिन धार्मिक विधिबाबत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, मंदिराचे पुजारी, मंदिर संस्थानचे विश्वस्त व पुरातत्व विभागाचे अधिकारी यांचीही बैठक घेण्याचे ठरले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.