धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील बीएएमएसच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थी शुभम अनसाजी लोंढे यांची दिल्ली येथील सीसीआरएएस या संस्थेंतर्गत स्टुडंटशीप प्रोग्राम फॉर आयुर्वेदा रिसर्च केन (स्पार्क) या संशोधन प्रकल्पासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे यांच्या उपस्थितीत लोंढे यांचे अभिनंदन करून संशोधन प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. टी. ए. मोमीन, डॉ. शितल कोपार्डे, डॉ. रेणुका देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर भिसे, डॉ. प्रवीण कोपार्डे, आणि श्रेया जानकर आणि पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी अधिष्ठाता डॉ. गंगासागरे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन, औषधी द्रव्यपूजन व प्रारंभीक आयुर्वेदीय पध्दतीने भल्लातक द्रव्याचे नारिकेल जलामध्ये शोधन करून प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. संशोधनासाठी निवडलेल्या प्रकल्पातील आठ घटक द्रव्यांपैकी एम घटक द्रव्य भल्लातक म्हणजे बीबा हा असून तो अत्यंत तीक्ष्ण, उष्ण या गुणधर्माचा आहे. त्यामुळे तो विषारी लक्षणे निर्माण करतो. बीब्याचे विषारी परिणाम नष्ट करण्यासाठी त्याचे आयुर्वेद शास्त्रात नमुद केल्याप्रमाणे शोधन करणे आवश्यक असते. त्यासाठी नारळाच्या पाण्यात बीबा तीन तास मंदाग्निवर उकळले जाते. या प्रकल्पाचा उद्देश जात्वादी धूमागद या औषधीय धूपाचा जंतुनाशक प्रभाव अभ्यासणे हा आहे. भविष्यात प्राकृतिक आणि आयुर्वेदीय उपायांचा वापर करून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करण्याचा हा एक महत्वाचा टप्प ठरणार आहे.