भूम (प्रतिनिधी)- राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना प्रति महिना दीड हजार रुपये देऊन मोठा आधार दिला आहे. या आधारा बरोबरच त्यांना संरक्षणही देणेही काळाची गरज आहे. असे मत प्रसिद्ध भारुडकार हभप संदिपान महाराज मोहिते सांगोला व हभप अण्णा महाराज चव्हाण जत यांनी संयुक्तरित्या भारुडाच्या कलगीरा कार्यक्रमातून व्यक्त केले.

रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी संतश्रेष्ठ गाडगेबाबा महाराज यांचा जयंती उत्सव समस्त परीट समाज बांधवांच्यावतीने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने सकाळच्या सत्रात प्रतिमेचे पूजन हभप व्यंकटेश महाराज व ज्येष्ठ समाज कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भूम व उळूप येथील भजनी मंडळाच्यावतीने कार्यक्रम झाला . त्यानंतर महाप्रसाद वाटप झाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रसिद्ध भारूडकार ह भ प संदिपान महाराज मोहिते सांगोला व ह भ प अण्णा महाराज चव्हाण जत यांचा कलगीतुरा भारुडाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पोट तिडकीने अगदी बेंबीच्या देटापासून प्रबोधन करताना  विचार विकत मिळत नाहीत ते आत्मसात करावे लागतील. वंशाला दिवा पाहिजे या आशेतून गर्भात हत्या झाल्या, चिंतणीय बाब असल्याची खंत व्यक्त केली. प्रसंगी नका करू पोटात खूण हो, उदया मिळणार नाही तुम्हा सून हो...या गीताच्या माध्यमातून प्रबोधन करत असतानाच महिलांना आरक्षणाची नव्हे संरक्षणाची गरज आहे. 4 वर्षाच्या मुलीवर 40 वर्षाच्या नराधमांकडून अत्याचार केला जात असेल तर अशा नराधमाना भर चौकात फाशी द्यायला हवी असे सांगितले.

संपूर्ण कार्यक्रमासाठी परीट समाज बांधव रोहित ढवळे, सोमनाथ लोखंडे, पिंटू लोखंडे, दत्ता ढवळे, चंद्रकांत पवार, अण्णासाहेब काटे, कल्पना पवार,  शीतल ढवळे, मनीषा लोखंडे, लता शिंदे, शकुंतला ढवळे,राणी शिंदे,  हनुमंत शिंदे, राहुल दळवी आदींनी परिश्रम घेतले,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कवीमनाचे पत्रकार शंकर खामकर यांनी मानले.

 
Top