भूम  (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या "आग्र्याहून सुटकेच्या" पराक्रमाविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संजय सोलापूरकर यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भूम येथील शिवप्रेमींनी केली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह मंत्री यांना उद्देशून उपविभागीय अधिकारी, भूम यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

शिवप्रेमींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महापुरुषांच्या इतिहासाची जाणीवपूर्वक चुकीची मांडणी करून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे प्रकार घडत आहेत. काही व्यक्ती प्रसिद्धीच्या हव्यासापोटी किंवा उद्देशपूर्वक इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. आधी चुकीची विधाने करायची आणि नंतर माफी मागायची, हा प्रकार सातत्याने सुरू आहे.

शिवप्रेमींच्या मते, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या "आग्र्याहून सुटकेच्या" पराक्रमाबद्दल केलेले विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्यांच्या वक्तव्यामुळे महाराजांचा अपमान झाल्याचे शिवप्रेमींचे मत आहे.

त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण होईल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास जबाबदार गृह मंत्रालय असेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

भूम येथील अनेक शिवप्रेमींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून ते उपविभागीय अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.

 
Top