धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झालेली असुन त्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हयातील एक लाख 80 हजार ई केवायसी करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. हा विषय घेऊन आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. ही मदत लवकर मिळण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 221 कोटी 81 लाख 30 हजार 080 रुपये नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त 15 हजार 391 शेतकऱ्यांना 23 कोटी 53 लाख 66 हजार 438 रुपये वितरीत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडुन नुकसान भरपाईसासठी वेळेत अपलोड करणे शक्य झाले नाही, सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीस जवळपास सहा महिने होऊन गेले. त्यात कळंब -65 हजार 331, परंडा-14 हजार 395, लोहारा 370, वाशी- 35 हजार 075 एवढ्या शेतक-यांची नुकसान भरपाईची मागणी असताना चार तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही.
तसेच एप्रिल 2024 व में 2024 मध्ये अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हयात दोन हजार 837 शेतक-यांनी नुकसान भरपाईची मागणी केले असुन त्यापैकी एक हजार 383 शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी कोटी 24 लाख 72 हजार 375 रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अवेळी झालेल्या पावसाचे अनुदान तात्काळ वितरीत करणे आवश्यक आहे. धाराशिव जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसाच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्याना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. या मागणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनंवर्सन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली.