धाराशिव (प्रतिनिधी)- आज विविध क्षेत्रात महिला काम करताना दिसतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांसाठी उमेदच्या माध्यमातून आयोजित या सरस- जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनातून उत्पादित केलेल्या वस्तू साहित्य व खाद्यपदार्थाची विक्री करण्याची संधी महिलांना मिळाली आहे.महिलांनी आणखी कोणकोणते साहित्य व वस्तू तयार करता येतात याकडे लक्ष केंद्रित करून दर्जेदार साहित्य व वस्तूंची निर्मिती करावी.जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी भविष्यात विविध उपक्रम राबवून त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले.

दि. 6 फेब्रुवारी रोजी धाराशिव येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सरस -जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून करताना पालकमंत्री सरनाईक बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी अशोक पाटील व उमेदचे जिल्हा व्यवस्थापक जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, या विक्री व प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बचतगटातील महिलांचे अभिनंदन करतो.बचत गटातील महिला ह्या उपक्रमशील आहेत.जिल्ह्यात आज 14 हजार 563 महिला बचतगट समूहामध्ये 1 लाख 43 हजार कुटुंब सहभागी आहेत. 14 हजार 300 स्वयंसहायता समूहांना प्रत्येकी 15 हजार रुपये याप्रमाणे खेळते भांडवल म्हणून 29 कोटी रुपये निधी वाटप केला आहे.14 हजार 133 समूहांना बँकांकडून 532 कोटी 67 लाख रुपये इतके भांडवल कर्ज स्वरूपात पुरवण्यात आल्याचे सांगून, सरनाईक म्हणाले, महिलांनी भांडवलाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन विविध व्यवसायाला सुरुवात करावी.असे त्यांनी सांगितले.

डॉ.घोष म्हणाले,6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या विक्री व प्रदर्शनातून 20 लक्ष रुपयांच्या वस्तू व साहित्याची विक्री अपेक्षित आहे.बचत गटातील उत्पादित वस्तू व साहित्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दयावी.त्यामुळे बचत गटातील महिलांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती साळुंखे म्हणाल्या,प्रत्येक महिलेने आज प्रत्येक क्षेत्रात जिद्दीने काम केले पाहिजे.राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श पुढे ठेवून महिलांनी वाटचाल केली पाहिजे.उमेदने महिलांना पुढे जाण्याचे बळ दिले आहे. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून प्रगती करावी. महिलांना कौतुकाची थाप दिली तर त्यांना प्रोत्साहन मिळते.घरातील प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास ती आपले कर्तृत्व सिद्ध करेल.असे त्यावेळी म्हणाल्या.

या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनात 160 स्वयंसहायता समूहांनी सहभाग घेतला असून यामध्ये 22 समूहांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल आहे. लातूर, बीड, जालना, सोलापूर, बुलढाणा व पुणे येथील 10 समूहांनी देखील सहभाग नोंदवला आहे.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी पत्रकार देविदास पाठक तसेच विविध बचत गटांच्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील उमेदच्या बचतगटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top