धाराशिव (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामे करून घेतली जावीत. असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
दि. 10 फेब्रुवारी रोजी धाराशिवच्या शिंगोली विश्रामगृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता एस.आर.कातकडे,सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिवचे अधीक्षक अभियंता बी.एम.थोरात,कार्यकारी अभियंता एस.के.चव्हाण आणि एन.व्ही. भंडे प्रमुख उपस्थित होते. भोसले यांनी सांगितले की,परंडा शहरातील मुख्य रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण केली जावीत.
मुख्य अभियंता कातकडे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू प्रकल्पांची माहिती सादर केली. 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पुढील कामे नियोजित आहेत. यामध्ये येरमाळा येथील विश्रामगृहाचे बांधकाम 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारती व निवासस्थानाचे बांधकाम 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. बेंबळी-नांदुर्गा रस्ता, करजखेडा-लोहारा-आष्टामोड रस्ता आणि परंडा-वादरवाडी फाटा-भातंब्रा-धाराशिव-सारोळा- शिवली-बोरफळ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून जामखेड - खर्डा-भूम-पारडी फाटा रस्ता, काटी -सावरगाव-सुरतगाव-पिंपळा- देवकुरळी-काटगाव-टेलरनगर आणि कळंब-ढोकी-तेर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीच्या शेवटी मंत्री भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की,सर्व प्रकल्प निश्चित वेळेत आणि योग्य गुणवत्तेत पूर्ण होणे आवश्यक आहे.निधीचा योग्य वापर करून, रस्ते आणि सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन प्रभावीपणे पार पाडावे, असे त्यांनी सांगितले.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतरही अधिकारी उपस्थित होते.