धाराशिव (प्रतिनिधी)- विविध शासकीय कार्यालयातील शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर आता प्रभावीपणे काम सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातील घटकांना विविध योजनांचा विहित कालावधीत लाभ मिळावा यासाठी “तेरणा युथ फाउंडेशन आपल्या दारी“ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. सदर अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार असून दर रविवारी याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत सर्व तक्रारींची लिखित नोंद घेऊन संबंधित व्यक्तींना त्याची पोच देण्यात येणार असून त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. धाराशिव शहरातील तांबरी विभाग येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून या विशेष उपक्रमाचा पहिला कार्यक्रम घेऊन शुभारंभ करण्यात आला.

प्रशासकीय पातळीवर असलेल्या विविध समस्यांमुळे अनेकदा शासनाच्या अनेक महत्वाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना उशिरा मिळतो किंवा त्यात अनेक अडचणी येतात. त्यावर आता तेरणा युथ फाउंडेशनने रामबाण उपाय शोधला आहे. उद्योग कर्ज, शैक्षणिक कर्ज, अनुदान, पिक विमा, लाडकी बहीण योजना, अपंग योजना, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना तसेच शेतीशी संबंधित विविध योजना, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद पंचायत समिती, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग, महावितरण विभाग यासह विविध प्रशासकीय विभागातील अडचणी जाणून घेऊन सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी कालावधीत हक्काचा लाभ मिळावा याकरिता हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात उपस्थित युवकांना यावेळी प्रा. किरण आवटे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. देशातील नव उद्योजकांना उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडुन मोठे सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले, युवकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित करीत पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याद्वारे शासकीय योजनेच्या लाभातून जिल्ह्यातील अनेक युवकांनी, महिलांनी स्वतःचे उद्योग उभारले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या अडचणी मांडल्या. सर्व तक्रारींची लिखित नोंद घेऊन संबंधित व्यक्तींना त्याची पोच देण्यात आली. हे अभियान संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात येणार असून  त्यातून सर्व स्तरातील समस्यांचे निराकरण करून सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य केले जाणार आहे. तांबरी विभागातील पहिल्याच कार्यक्रमात 68 नागरिकांनी आपल्या समस्यांची लिखित स्वरूपात नोंदणी केली. यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजाच्या तक्रारी, जागेचे प्रश्न, रस्ता, अतिक्रमण, रोजगार आदी बाबींचा समावेश आहे. यावेळी भाजप नेते नितीन काळे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, भाजप चे धाराशिव शहराध्यक्ष अभय इंगळे, युवराज राजेनिंबाळकर, प्रवीण पाठक, प्रा. किरण आवटे, तेरणा युथ फाउंडेशनचे धनराज नवले, अक्षय विंचुरे, सौरभ शिंदे, रोहन दहीटनकर, रय्यान रजवी आदी उपस्थित होते.

 
Top