धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपुरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. स्थानिक युवकांना जिल्ह्यातच हक्काच्या रोजगार संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यापीठाकडून त्यासाठी तांत्रिक सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार तुळजाभवानी मंदिर समितीने बुधवार 12 फेब्रुवारी रोजी सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठासोबत तांत्रिक सहकार्य कराराची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने पुढे जात आहेत. विविध योजना, प्रकल्प, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार पुढील एक-दोन वर्षात आपल्याला मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी स्थानिक युवकांना आधुनिक, एकात्मिक आणि व्यापक असे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन कौशल्यधारीत शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्यासाठी तुळजापुरात कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना आपण मांडली होती. ती पूर्णत्वाला नेण्यासाठी सिम्बायोसिस कौशल्य विकास विद्यापीठ आणि तुळजाभवानी मंदिर समिती यांच्यात कौशल्य विद्यापीठ उभारणीसाठी तांत्रिक सहकार्य कराराची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा आपण पूर्ण केला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कौशल्य विद्यापीठामुळे मोठ्या रोजगार संधी  : आमदार पाटील

कौशल्य विद्यापीठ हे उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण निर्माण करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण, स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन, नोकरीवर आधारित प्रशिक्षण, याला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष विद्यापीठ असणार आहे. त्यातून प्लेसमेंटही मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रशिक्षणानंतर, मूल्यांकन यंत्रणेमार्फत मूल्यांकन करून पात्र तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 
Top