धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. या शोभायात्रेत सर्वच धर्मियांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, नेताजी पाटील, डॉ. चंद्रजीत जाधव, अग्निवेश शिंदे, आशिष मोदानी, मसूद शेख, आदित्य पाटील आदींचीही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयघोष करत शहरातून सर्वत्र शोभायात्रा फिरवण्यात आली. यावेळी उंटावर छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मुलींनी तालबध्द पध्दतीने लेझिमवर नृत्य सादर केले. अस्सल मराठमोळा वेश परिधान करून युवतींनी झांझ व ध्वज हातात घेवून नृत्य सादर केले. पारंपारिक संभख वाजवत देवींचे गीत गाणाऱ्या पथकानेही टाळ्या मिळवल्या.
शोभायात्रेच्या माध्यमातून शिवरायांना वंदन करण्यासाठी सर्वच जाती धर्मातील नागरिकांच्या पथकांनी हजेरी लावली होती. यावेळी धनगरी गजा ढोल पथक, मुस्लिम समाजाचे तिरंगा पथक, मावळा पथक आदी शहरवासियांचे आकर्षण ठरले. शोभायात्रेत रथांचाही समावेश करण्यात आला. यावर शेतकरी व शिवकालीन देखावे सादर करण्यात आले. त्यामुळे शोभायात्रेत रंगत आली.