भूम (प्रतिनिधी)- नवीन रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांना शुक्रवार दिनांक 7 रोजी निवेदन दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सोलापूर येथील कार्यालयात देण्यात आले.
यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोरख भोरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुर्डूवाडी ते भूम परंडा वाशी बीड मार्गे जालना हा नवीन रेल्वे मार्ग करण्यात यावा. अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, कुर्डूवाडी भूम परंडा वाशी पारगाव मांजरसुंबा बीड मार्गे जालना हा रस्ता एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग ठरू शकतो. या नवीन मार्गामुळे मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र मध्य प्रदेश मुंबई गोवा कोल्हापूर यासारख्या विविध राज्यांना व महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या शहरांना जोडला जाऊ शकतो. त्याचा फायदा तीर्थक्षेत्रे जवळ येण्यासोबतच व्यापारी क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात होणारा आहे. हा मार्ग निर्माण झाल्यास या भागात शैक्षणिक व्यावसायिक औद्योगिक शेती विषयक प्रगती साधून दरडोई उत्पन्नात भर पडण्यास देखील मदत होणार आहे. तसेच या भागातील व्यवसायांना स्वस्त मालवाहतूक करण्यासाठी साधने उपलब्ध होणार आहे. तसेच भाविक भक्तांना तीर्थक्षेत्रांना ये जा करण्यासाठी देखील स्वस्त व फायदेशीर साधन या मार्गामुळे निर्माण होणार आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर अनेक रेल्वे स्टेशन, जंक्शन, शक्तिपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग यासह विविध मार्गांना हा भाग जोडला जाणार आहे. या मार्गामुळे भूम परंडा वाशी या तालुक्यांसह चौसाळा मांजरसुंबा या भागाचा देखील औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. तसेच या भागातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देखील या मार्गामुळे निर्माण होणार आहे. हे निवेदन रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांना देण्यात आले. या मार्गामुळे श्रीक्षेत्र शेगाव, लोणार सरोवर, सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान महाराष्ट्र सोबत जोडली जाणार आहेत. तसेच जालना शहर हे पोलाद उत्पादनामध्ये देशात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले शहर आहे. ते देखील या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडले जाणार आहे. या नवीन रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील तीर्थक्षेत्रे एकमेकांना जोडली जाऊन भाविक भक्तांना येजा करण्यासाठी मोठी सोय होणार आहे.