तुळजापूर (प्रतिनिधी)- आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी तुळजाभवानी मंदिर विकासकामांची आढावा बैठक श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे घेतली. यावेळी त्यांनी विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या विकासकामांच्या सद्यस्थितीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊन पुरातत्व विभाग, मंदिर प्रशासन तसेच पुजारी मंडळासोबत प्रस्तावित कामासंदर्भात चर्चा केली.
देवीजींच्या मूळ गाभाऱ्याचे काम करावयाचे प्रस्तावित असून याबाबत काम करुणेचा झाल्यास देवीजींची मूर्ती हलविता येईल किंवा दर्शनाचे नियोजन कसे करता येईल याबाबतचे लेखी अभिप्राय तिन्ही पुजारी मंडळ व महंत यांनी पुढील 15 दिवसांत मंदिर संस्थानाकडे सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. भवानीरोड वरील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी उपाययोजना करणेबाबत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना सूचना बैठकीत देण्यात आल्या. पुरातत्व विभागाकडून येत्या शुक्रवार पर्यंत गाभाऱ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करण्यात येईल असे सांगण्यात आले. भवानी शंकर मंडपाचे काम करताना सर्व खांबांची रचना वेगवेगळी आढळून आल्याने त्यातील एक खांब नमुना म्हणून निवडण्यात आला असून त्यावर सर्वांची मते घेऊन त्याप्रमाणे सर्व खांबांची रचना करण्याबाबत चर्चा बैठकीत झाली. मंदिर आवारातील यज्ञ मंडपाशेजारील पिंपळपाराला पुरातन स्वरूप देणेस्तव काम सुरू असून या पाराची उंची आधीपेक्षा कमी करणेविषयी चर्चा झाली. मंदिर पोलीस चौकीसाठी नवीन बांधकाम प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पूर्ण झालेले असून त्याठिकाणी पोलीस चौकी हलविणेबाबत निर्णय बैठकीत झाला.
बैठकीस महंत तुकोजीबुवा, तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाने व अन्य अधिकारी, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे व हेमंत पाटील, महंत व तीनही पुजारी मंडळाचे अध्यक्ष तसेच मंदिराचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.