धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक युनानी दिवस 11फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे साजरा करण्यात आला. हा दिवस महान युनानी चिकित्सक,शिक्षक,सामाजिक सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अबरार अहमद देशमुख (युनानीतज्ञ,आयुष विभाग) यांनी केले.त्यांनी युनानी चिकित्सा प्रणालीच्या महत्त्वावर प्रकाश टाकत हकीम अजमल खान यांचे योगदान अधोरेखित केले.युनानी चिकित्सा प्रणालीला वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त करून देण्याचे श्रेय त्यांना जाते.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सत्रात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चाकूरकर यांनी युनानी औषधपद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.त्यांनी सांगितले की,ही प्रणाली ग्रीक,अरबी आणि भारतीय संस्कृतींच्या मिश्रणातून विकसित झाली आहे.अग्नी,जल,वायु आणि पृथ्वी या चार मूलतत्त्वांच्या संतुलनावर शरीराचे स्वास्थ्य अवलंबून असते.युनानी औषधांमध्ये वनस्पती,खनिजे आणि मध यांसारख्या नैसर्गिक घटकांचा समावेश असतो.ही पद्धत केवळ लक्षणांवर उपचार न करता शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही घटकांचा विचार करते.त्यामुळे आजही भारतात मोठ्या प्रमाणावर युनानी औषधांचा उपयोग केला जात आहे.
या कार्यक्रमाला डॉ.शिवाजी फुलारी (निवासी वैद्यकीय अधिकारी),डॉ. गजानन परळीकर (जिल्हा आयुष अधिकारी),डॉ.विकास पवार (जिल्हा आयुष कार्यक्रम अधिकारी) तसेच आयुष विभागातील डॉ.कोथळकर, डॉ. सय्यद उजमा,डॉ.महेविष, डॉ.पवार,डॉ.खान याच्यासह श्री मनोज पतंगे (योगा नॅचरोपॅथी) आणि श्री भारत हिंगमिरे यांची उपस्थिती होती.