धाराशिव (प्रतिनिधी)- पुरातत्व खात्याने केलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराचे प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यावर नंतरच्या काळात अडीच फूट जाडीचे नवे सिमेंट काँक्रीटचे व दगडांचे आवरण दिल्यामुळे वजन वाढले आहे. परिणामी मंदिराचे शिखर ज्या तुळईवर उभे आहे त्याच्या चार पैकी दोन दगडी शिळांना तडे गेले असल्याचा निष्कर्ष पुरातत्व विभागाने नमूद केला आहे. त्यामुळे संपूर्ण शिखर उकलून पुन्हा उभारले जाणार आहे. प्राचीन काळी ज्या प्रकारचे शिखर होते तसे मूळ शिखर साकारून त्याला सोन्याने मढविण्यात येणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
पुरातत्व खात्याने संरचनात्मक लेखापरिक्षण अहवालच्या (स्ट्रक्चरल ऑडिट) आधारे जे निष्कर्ष काढले आहेत. यामध्ये त्यांनी “मंदिर बांधकाम हे दगडामध्ये असले तरी मुळ मंदिराच्या बांधकामध्ये वारंवार बदल करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात संरचनात्मक बदल झालेला आहे. सध्या मंदिरामध्ये शिखराचा अतिरिक्त भार झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिखराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच तुळजाभवानी मातेचे मंदिर हे भूकंप क्षेत्र 4 च्या आणि किल्लारीच्या भूकंप प्लांट झोनच्या 80 कि.मी.च्या आत असल्याने मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत संरचनात्मक लेखापरिक्षण अहवाल बघता मुख्य मंदिराच्या गर्भगृहाचे व शिखराचे काम करणे आवश्यक असून पुढील योग्य कार्यवाहीस्तव हा अहवाल सविनय सादर करीत असल्याचा सुस्पष्ट निष्कर्षही पुरातत्व खात्याने काढला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. श्री तुळजाभवानी मंदिर शेकडो वर्ष जुने आहे. मंदिरामध्ये असलेले दगडी खांब, भिंती, मंदिराचे छत तसेच मंदिराचे शिखर आणि कळस या सर्व भागांची तपासणी शास्त्रोक्त पद्धतीने भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
सहा महिन्यांच्या आत शिखर पूर्ण होणार
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे शिखर सहा महिन्यांच्या आत पूर्ण होईल. असा विश्वास पुरातत्व विभागाने व्यक्त केला आहे. सध्याच्या अहवालावरून मंदिराच्या भिंती काढण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र काम करताना त्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि आवश्यकता भासल्यासच भिंती काढल्या जातील असेही पुरातत्व विभागाने म्हटले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.