धाराशिव (प्रतिनिधी)-मस्साजोग प्रकरणातील सुरक्षा रक्षक सोनवणे यांची पहिल्यांदा केलेली ॲट्रॉसिटीची फिर्याद नोंद करून घेतली नाही व काहीच कारवाई न केल्यामुळे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यास सहआरोपी करावे. अशी शिफारस केली असल्याची माहिती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

आयोगाचे सदस्य ॲड. लोखंडे हे सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील अडअडचणी समजून घेण्यासाठी हा आपला दौर असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संसदेने केलेले ॲट्रॉसिटीबाबतचे कायदे बंधनकारक आहेत. त्यामुळे ॲट्रॉसिटी संदर्भात कायद्याचे पालन अधिकारी वर्गाने करणे आवश्यक आहे. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ॲड. लोखंडे यांनी मस्साजोग प्रकरणी सोनवणे यांची संबंधित पोलिस अधिकारी यांनी ॲट्रॉसिटीची फिर्याद नोंद करून घेतली नाही व काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे आयोगातर्फे संबंधित पोलिस अधिकाऱ्यास सहआरोपी करण्याची शिफारस आयोगाने केली आहे. असे ॲड. लोखंडे यांनी सांगितले की, धाराशिव जिल्ह्यात दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत 92 एकर जमीन खरेदी केली आहे. परंतु त्यापैकी 27 एकर जमीनच ताब्यात घेवून लाभार्थ्यांना वाटप केली आहे. बाकी इतर जमीनीचे काय केले? या संदर्भात माहिती घेवून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचेही ॲड. लोखंडे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी सामाजिक चळवळीतील धनंजय शिंगाडे उपस्थित होते.


 
Top