धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस अधीक्षक,धाराशिव यांच्या शिफारशीनुसार आणि भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,2023 च्या कलम 163 नुसार  जिल्ह्यात 17 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्लाझमा, बीम लाईट व लेझर बीम लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे.

जिल्ह्यात 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 28 फेब्रुवारीपर्यंत विविध संघटना,पक्ष व मंडळांकडून मिरवणुका,रॅली आणि शोभायात्रा आयोजित केल्या जाणार आहेत.या उत्सवाच्या वेळी प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता आहे.या तीव्र प्रकाशाच्या झोतातून लहान मुले,वृद्ध नागरिक व सामान्य लोकांच्या डोळ्यांना इजा पोहोचू शकते तसेच वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 (1) नुसार नागरिकांच्या जीवितास किंवा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असेल,तर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचा अधिकार प्रशासनास आहे.त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्लाझमा,बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंधित राहील. तरी सर्व संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर संबंधित कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.असे अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी आदेशात नमूद केले आहे.


 
Top