धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी दि. 6 फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या मुदत वाढीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील अनेक खरेदी केंद्रावर  मंगळवारी रात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी केंद्रावरच रात्र जागून काढली. शासनाने दि. 6 फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ देवूनही धाराशिव जिल्ह्यात 5 फेब्रुवारीपर्यंत 12497 शेतकऱ्यांचे 3 लाख 30 हजार 760 क्विंटलची खरेदी झाली आहे. दि. 6 फेब्रुवारी या शेवटच्या दिवशी 21 हजार शेतकऱ्यांचे जिल्ह्यात 5 लाख 60 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर शेतकरी वाहनांसह मुक्कामी थांबले आहेत. धाराशिव जिल्ह्याला 21 केंद्र मंजूर झाली असून, विशेष म्हणजे ही सर्व केंद्र सुरू आहेत. यामुळे 16 जानेवारीपर्यत जिल्ह्यातील 6 हजार 279 शेतकऱ्यांचे 1 लाख 57 हजार 38 क्विटल तर मुदतवाढीनंतर दि. 5 फेब्रुवारीपर्यंत 3 लाख 04 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली होती. मात्र आता केवळ एका दिवसात उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे वास्तव आहे. आज शेवटच्या दिवशी 21 हजार शेतकऱ्यांचे 5 लाख 60 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. तर धाराशिव तालुक्यात 1300 शेतकऱ्यांकडून 21 हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. गेल्या पाच-सहा दिवसापासून शेतकरी ट्रॅक्टर, टेम्पो आदीमध्ये सोयाबीन कट्टे घेवून खरेदी केंद्राच्या पुढे रांगेत उभारलेले आहेत. 


शेतकऱ्याला आर्थिक व मानसिक त्रास

गेल्या तीन-चार दिवसापासून शेतकरी वर्ग आपल्या वाहनांसह रांगेत खरेदी केंद्रासमोर उभा आहे. शेतातून खरेदी केंद्राकडे सोयाबीन कट्टे आणण्याचे भाडे 2 हजार 500 रूपये एक वाहन घेतो. तर मुक्कामी थांबल्यानंतर 1 हजार रूपये थांबण्याचे चॉजेस वाहनधारक लावत आहेत. काही खरेदी केंद्रावर सोयाबीन कट्टे चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनात आणलेल्या सोयाबीन कट्ट्याचे रात्रभर जागून संरक्षण करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या आर्थिक व मानसीक त्रासाने त्रस्त झाले आहेत. 


31 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता सुचना

जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र 21 आहेत. या सर्व 21 खरेदी केंद्रावर 31 जानेवारीपर्यंत खरेदी करण्याची परवानगी होती. परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. ही मुदत वाढीची सुचना सरकारच्या पोर्टलवर सांयकाळी 6 वाजता आली होती. त्यामुळे आज किती वाजेपर्यंत मुदत वाढीची सुचना येते की नाही याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. 

 
Top