धाराशिव (प्रतिनिधी)-  आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकरी बांधवांपैकी केवळ 25 टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या 75 टक्के नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी 31 जानेवारीपर्यंत करणे निव्वळ अशक्य असल्याने सोयाबीन खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी यासाठी आपण राज्य सरकारकडे आग्रही पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे आता 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आले नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल पाहता, अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी यासाठी आपण व्यक्तिशः  राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला आज यश मिळाले आहे. धाराशिव जिल्हा आणि परिसरात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून सोयाबीनला बहुतांश शेतकऱ्यांची पसंती आहे. त्यामुळे यंदाच्या खरिप हंगामात 4 लाख 62 हजार 872 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला रास्त हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात 35 हजार 403 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 18 हजार 209 शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यातील 7 हजार 639 शेतकऱ्यांच्या 1 लाख 97 हजार 194 क्विंटल सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या संख्येच्या तुलनेत खरेदी झालेली संख्या केवळ 21 टक्क्यांच्या घरात आहे.


 
Top