भुम (प्रतिनिधी)- भूम राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मुख्य स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद हायस्कूल, भूमच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना आता बारावीपर्यंत दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
स्कॉलरशिप परीक्षा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी घेतली जाते. यावर्षी घेतलेल्या परीक्षेत भूमच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या 11 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यशस्वी विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत मुक्ता संदीप पाटोळे,सुमय्या अब्दुल्ला अलहमेद, रुद्रप्रताप विठ्ठल खवले, सुरज सूर्यकांत सराटे,आर्यन विकास जाधव,समीक्षा संतोष म्हेत्रे,अस्लम इस्माईल हाकीम,सायली शिवाजी गुंजाळ, साक्षी शंकर वारे,मयुरी नवनाथ जाधव
सत्कार समारंभ आणि शिक्षकांचे योगदान या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे आणि शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद व्यक्त करत उपस्थित शिक्षकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. या विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी तात्या कांबळे, उत्तरेश्वर पायघन, काकासाहेब पवार, दयानंद पाटील, दत्तात्रय गुंजाळ यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच, स्कॉलरशिप विभाग प्रमुख काकासाहेब पवार यांनी नियमित सराव परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि हे यश शक्य झाले.
शाळेचे आणि पालकांचे कौतुक विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संपूर्ण शाळा परिवार आणि पालकांकडून अभिमान व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषद हायस्कूल, भूमने या परीक्षेत केलेली कामगिरी प्रेरणादायी असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पुन्हा एकदा दर्शन घडवले आहे. शाळेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.