धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील योगा सेंटरच्या महिलांनी रथसप्तमीनिमित्त सलग 108 सूर्यनमस्कार  करून अनोखी आणि आगळीवेगळी अशी रथसप्तमी साजरी केली. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अनन्य साधारण महत्त्व असून मकर संक्रांत हा सण संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा केला जातो. त्यात रथसप्तमीचे विशेष महत्त्व असून सूर्याच्या उपासनेचा हा दिवस असल्याने महिला या दिवशी सूर्याची उपासना करून गोडधोड पदार्थ करतात आणि हा सण साजरी करतात.

परंतु येथील श्री योगा सेंटरच्या संचालिका सौ.कल्पना बोरा दरवर्षी  रथसप्तमीनिमित्त योगा सेंटरमध्ये मोफत योगा ठेवून सलग 108 सूर्यनमस्कार  घेतात.

 हीच परंपरा या वर्षी देखील त्यांनी कायम ठेवली आणि महिलांसाठी आठ दिवस मोफत योगाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये महिलांनी आरोग्यवर्धक असे 108 सूर्यनमस्कार करून रथसप्तमी साजरी केली. यावेळी कल्पना बोरा म्हणाल्या की आज याचे शल्य आहे की , महिला सर्व बाबतीत सजग असतात. परंतु स्वतःच्या आरोग्याची म्हणावी तितकीशी काळजी घेत नाहीत.  त्यामुळे आपण खारीचा वाटा उचलावा याप्रमाणे मी सतत योगाच्या माध्यमातून महिलांना आरोग्य विषयी संदेश देत असते. यावेळी सलग न थकता 108 सूर्यनमस्कार करणाऱ्या शोभा हनुमंत शिंदे यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.  तसेच सुनीता गुंजाळ यांचा सातत्यपूर्ण योगा करत अनेकींना प्रेरणा देत असल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी शहरातील महिलांनी  या मोफत  योगाचा लाभ घेतला.

 
Top