धाराशिव (प्रतिनिधी)-  तेरणा धरण क्षेत्रातील शेतकरी बांधवांची शेतीच्या पाण्याची चणचण आता कायमस्वरूपी दूर होणार आहे. तेरणा मध्यम प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी आपण 3 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील सात गावातील दीड हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरण परिसरात भेट देऊन देऊन कामाचा दर्जा राखण्याचे निर्देश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

या विशेष दुरुस्ती कामाच्या अंतर्गत डाव्या कालव्याचे अंतर 15 किलोमीटर लांबीचे आहे.त्यातून साधारणपणे 750 हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. त्यामुळे तेरणा मध्यम प्रकल्पाच्या परिसरातील तेर, रामवाडी, पानवडी आणि भंडारवाडी या चार गावातील शेती आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच 16 किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्याचे कामही प्रगतीपथावर आहे. तेही लवकरच पूर्ण होईल. त्यातून साधारणतः 902 हेक्टर क्षेत्र सिंचनावाखाली येणार आहे. यात तेर, वानेवडी, डकवाडी, कोळेवडी, इर्ला आदी गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कालवा दुरुस्तीच्या कामामध्ये कालव्यातील झाडेझुडपे साफ करणे, गाळ काढणे व गळती होत असलेल्या ठराविक ठिकाणी काँक्रीट लाइनिंग करणे तसेच कालव्यावरील जुन्या बांधकामाची डागडुजी करणे, प्रवाह मापक यंत्र बसवणे आदी बाबींचा यात समावेश आहे. वरील  सर्वच कामे जवळपास पूर्ण होत आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. बंद पाईपलाईनद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.

 
Top