धाराशिव (प्रतिनिधी)- प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्मलेल्या व ज्यांच्या अथक प्रयत्नाने गंगा भारतभूमीवर अवतरली आणि आपला प्रदेश सुजलाम सुफलाम झाला. त्या राजा भगीरथाला आदर्श मानून वाटचाल करणाऱ्या गवंडी समाजाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठा हातभार आहे. अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या या वर्गाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत, त्याचा सामान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते सुनील चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश दंडनाईक, युवा नेते विनोद गंगणे, तुळजापूर बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, ॲड. दीपक आलुरे, वसंत वडगावे, प्रभाकर मुळे, प्रशांत लोमटे, अनिल बंडगर, प्रभाकर भोसले, दिनकर पाटील, अशोक शेळके, वैजीनाथ कोणाळे, बनसिद्धप्पा कोणाळे, शिवराज मरडे, विठ्ठल मरडे, विलास मरडे उपस्थित होते.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, राज्यात महायुती व देशात मोदींचे केंद्र सरकार देशहित आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. सरकारकडून गवंडी समाजासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मुलांंचे शिक्षण, पक्के घर बांधणी, मध्यान्ह भोजन योजना यांच्यासह राबविण्यात येणाऱ्या इतर कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार रोजगारनिर्मिती करण्याचा आपला निश्चय असून यासाठी आपली साथ गरजेची आहे.
सामाजिक सभागृहासाठी 10 लाख
किलज येथे गवंडी समाजबांधवांच्या विविध कार्यक्रम व उपक्रमांसाठी राजा भगीरथ सामाजिक सभागृहाची मागणी गवंडी समाजबांधवांनी केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने त्यासाठी आमदार निधीतून 10 लाख निधी देण्याचे आश्वासन दिले.