धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठ लोणेरे यांच्या इंनोवेशन इंक्युबॅशन आणि एंटरप्राइज फोरम च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्टार्टअप अँड इंटरप्रीनुरियल अपॉर्च्युनिटीज हा संदर्भ घेऊन येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये उद्योजकतेवर मार्गदर्शन आयोजित केले होते.
यासाठी विविध शासकीय योजनांवर काम करून 1000 पेक्षा जास्त कार्यक्रमात मार्गदर्शन दिलेले व अनेक उद्योगधंदे यशस्वी उभे केलेले अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. किरण आवटे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने ,बेसिक सायन्स अँड हुमानिटीच्या विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे, फार्मसी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रीती माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा. किरण आवटे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असेल तर ते जग जिंकू शकतात .
कुठल्याही नोकरीमध्ये मर्यादा असून त्यामध्ये व्यक्ती गुंतून राहतो. परंतु स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीमध्ये चिकाटी ,धैर्य असेल तर भांडवल नसतानाही आपण व्यवसायामध्ये गगन भरारी घेऊ शकतो. व इतरांनाही त्यामधून आपण नोकरी देऊ शकतो .
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना असून त्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की यामध्ये सबसिडी ही मोठ्या प्रमाणात दिली जाते. त्याचा अभ्यास करून येणाऱ्या तरुणांनी व्यवसायामध्ये उतरले पाहिजे. यावेळी त्यांनी यशस्वी उद्योजकतेचे अनेक संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची काम केले. या कार्यक्रमासाठी 100 अधिक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने म्हणाले की अभियांत्रिकी आणि फार्मसी सारख्या उच्चतंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसायामध्ये गगन भरारी घेता येते त्यासाठी किमान कौशल्यावर आधारित काही कोर्स त्यांनी करणे गरजेचे असते आणि त्या अनुषंगाने महाविद्यालय सातत्यपूर्ण प्रयत्नशील आहे. आमच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी नोकरी करणारे असतील, तरीही अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःची कंपनी, उद्योगधंदे उभे करून आज यशस्वी उद्योजक झालेले आहेत . यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा वडणे, डॉ. प्रीती माने यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुनीता गुंजाळ यांनी मानले.