धाराशिव (प्रतिनिधी)- पवणार ते पत्रादेवी शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग क्र 10 या  शक्तिपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना गुरुवारी (दि.16) दिले. 

धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी या महामार्गाला विरोध केला असून, यापुढेही आमचा विरोध कायम असणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासून विरोध असूनही शासन हा महामार्ग रेटून नेत आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, ज्या प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आहे. त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा व सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी विनंती बाधित शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. आमच्या मागण्यांचा विचार न करता भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेऊन, आपल्या भावना राज्य सरकारला कळविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी बाधित शेतकऱ्यांमधील सुदेश इंगळे, संभाजी फरतडे, अभिजीत देशमुख, डॉ. सिद्धेश्वर जाधव, दर्शन पडवळ, अंकुश लोबे, नामदेव एडके, नामदेव देशमुख, सुनील भोसले,गोविंद माने, राहुल कदम, गणेश एडके, सज्जन यादव यांची उपस्थिती होती.

 
Top