धाराशिव (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी काही हलचाली चालू आहेत. पण जिल्ह्यातील इतिहास पाहता तेथील अवैध तसेच गुन्हेगारी स्वरूपाची संस्कृती धाराशिव जिल्ह्यात नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नको आहे. याबाबतचे निवेदन समस्त धाराशिवकरांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा तत्काळ घ्या, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व मदत करणाऱ्या आरोपींना सह आरोपी करून तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा हा भाई उध्दवराव पाटील, प्रमोद महाजन यांच्या विचाराने प्रेरीत झालेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात बीड सारखी गुन्हेगारी नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये पण पवनचक्कीचे जाळे पसरले आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सराईत गुन्हेगार असल्याचे दिसत आहे असा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनाचा प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पाठविण्यात आली आहे. या निवेदनावर मुकूंद घाडगे, मनोज देशमुख, आकाश मुंडे, रोहन पडवळ, गणेश साळुंखे, संकेत सुर्यवंशी, संदीप इंगळे, अभय इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.