धाराशिव (प्रतिनिधी)- दिव्यांग असल्यामुळे कधी संघर्ष करताना मरगळ येते, मन उदास होतं, पण शब्द माझे सोबती होतात आणि मी कवितेच्या साथीने माझे दुःख विसरते. आज माझ्या याच कवितेचा सन्मान सावित्रीबाई फुले मंडळाच्या सावित्रीच्या लेकींनी केला आणि माझे मन भारावून गेले. असे प्रतिपादन अंगणवाडी शिक्षिका कवयित्री कांचनगंगा मोरे यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले मंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुले मंडळाने यंदाच्या वर्षी थोडा अनोखा उपक्रम या जयंतीच्या निमित्त राबविला. आलेल्या प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांनी भाषणापेक्षाही सावित्रीबाई फुले यांच्या पूर्ण कार्यकर्तृत्वावर चर्चा केली आणि उपस्थित महिलांमधून त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लावली. गेल्या दीड दोनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जे केले ते आपण करू शकलो नाही याबद्दल खंत बाळगून इथून पुढे कमीत कमी अशा गोष्टींना आपण प्रोत्साहन देऊयात असा सर्वजणींनी संकल्प केला.
याच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या कवयित्री बी. सुरभी म्हणाल्या की, जीवनात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. पण परमपित्या ईश्वराची साथ असल्यामुळे व कवितेने साथ दिल्यामुळे मी संकटांना तोंड देऊ शकले. बी. सुरभी यांनी अनेक चित्रपटांचे गीत लेखन केले आहे. तसेच राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या जीवनावरील चित्रपटात ही त्यांनी गीत लिहिले आहे.
या कार्यक्रमात कमल नलावडे, डॉ. सुलभा देशमुख, स्नेहलता झरकर अंदुरे, प्रा. विद्या देशमुख, प्रेमा जांभळे, विमल तावडे, सुमन ढगे, छाया खडबडे, योगिता सुरवसे, शीतल माळी, अनुजा माळी या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा व विविध खेळ घेण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक मोहिनी शिंदे व प्रा. विद्या देशमुख यांनी तर द्वितीय क्रमांक प्रेमा जांभळे यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनीता गुंजाळ यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय मंडळाच्या अध्यक्ष डॉ.रेखा ढगे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन अर्चना गोरे यांनी केले. अपसिंगा येथील माजी सरपंच वैशाली गोरे व प्रगतीशील शेतकरी मंगल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले मंडळाच्या कोषाध्यक्ष रजनी शिंदे, सचिव मीनाक्षी माळी, प्रमोदिनी काळे, वंदना लोखंडे, लता माळी,सविता माळी, मंजुषा ढगे, संगीता माळी, सुरेखा माळी,उषा लांडगे, क्रांती माळी, मीना माळी, सुलोचना खोत, शरयु गोरे, कुमुदिनी घुटे या सदस्यांनी परिश्रम घेतले.