कळंब (प्रतिनिधी)- संस्था सचिवाने दाखल केलेला खोटा व बनावट चेंज रिपोर्ट सहा धर्मादाय आयुक्त धाराशिव यांनी रद्दबातल केला असून मुळ संस्था संचालकांनाच कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की कळंब तालुक्यातील पिंपळगाव (को) येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वसंत माध्यमिक विद्यालय आहे. इ स 1986 साली स्थापन झालेल्या संस्थे चे कामकाज 2010 पर्यंत सुरळीत चालू होते. नंतर च्या काळात संस्था सचिव उध्दव कोठावळे व इतर संचालकांमध्ये सुसंवाद राहिला नाही. वेळोवेळी सचिव इतर संचालक व मुख्याध्यापक यांना विश्वासात न घेता मनमानी करू लागले, खोटे व बनावट दस्तऐवज बनवून, कट- कारस्थान करून मानसिक त्रास देऊ लागले.
इ स 2011 मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. सचिवांनी त्यांच्या मर्जीतील व्यक्तींना नियमबाह्य व गैर मार्गाने नवीन सभासद करून घेतले, विद्यमान तीन संचालकांना कमी केले. काही शिक्षक, संचालक व नवीन सभासदांच्या मदतीने चेंज रिपोर्ट एक वर्ष उशिराने म्हणजे दि 12/07/2012 रोजी मा सहा धर्मादाय आयुक्त धाराशिव येथे दाखल केला. याला इतर मुळ संचालक बब्रुवान तांबडे, डॉ रामकृष्ण लोंढे, माणिकराव कातमांडे, भैरू कोठावळे यांनी विरोध करून हरकत नोंदवली. सदरील प्रकरण तब्बल 12 वर्ष 5 महिने चालले. मध्यंतरीच्या काळात कोरोना माहामारी मध्ये तीन संचालकांचा मृत्यू झाला. दोन्ही बाजूचे पुरावे, लिखित दस्तऐवज व मौखिक साक्ष, उलट तपासणी ईत्यादी तपासले गेले. उभय पक्षांच्या विधिज्ञांचे युक्तिवाद तपासण्यात आले. दि 26/12/2024 रोजी मा सहा धर्मादाय आयुक्त धाराशिव रूपाली कोरे मॅडम यांनी संस्था सचिव उध्दव कोठावळे यांनी सादर केलेला चेंज रिपोर्ट बनावट व खोटा असल्याचा निर्वाळा देऊन रद्दबातल ठरविला. संस्थेच्या सर्व मुळ संचालकांन कायम ठेऊन त्यांची नोंद परिशिष्ट क्रमांक 01 वर घेण्याचे निर्देश दिले व प्रकरण निकाली काढले.
फिर्यादी तर्फ पी एम जोशी यांनी काम पाहिले तर विरोधी पक्षाच्या वतीने एस. एस. सांडसे, सुधाकर मुंढे व ज्योतिराम पवार यांनी बाजू मांडली. या निकालामुळे खोटे व बनावट दस्तऐवज बनवून संस्थेमध्ये हेराफेरी करणारांचे धाबे दनानले असुन शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.