परंडा (प्रतिनिधी) - युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून देशहिताचे कार्य करावे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात प्रा.माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील समुपदेशक मकरंद वांबुरकर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्राध्यापक भाऊसाहेब माने ,व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ अमर गोरे पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.बी.डी.माने म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी देशातील तरुणांना प्रोत्साहित केले. त्यांचे विचार महान होते.आयुष्याला कलाटणी देणारे त्यांचे विचार असल्याने ज्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले त्यांच्या जीवनाचे कल्याण झाले.देशाचे भवितव्य असलेला आजचा तरुण हा व्यसनाधीन झालेला आहे. त्यामुळे त्यांचे ध्येय त्याचे भविष्य अंधारमय झालेले आहे.तेव्हा महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचनही केले पाहिजे.महापुरुषांची पुस्तके वाचली पाहिजेत.तरच तुम्हाला महापुरुषांचा इतिहास माहीत होईल.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सुनील जाधव म्हणाले की महाविद्यालयात जे विद्यार्थी नियमीत येतात त्यांच्यासाठी महाविद्यालयाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत विविध कोर्सेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या संधी निवडता येतात .विद्यार्थ्यांनी थोरा मोठ्यांच्या व गुरुजनांचा मानसन्मान केला पाहिजे . आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्रा वरपे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रा.दीपक हुके ,प्रा. अजित क्षीरसागर प्रा. वरपे ,प्रा.प्रतिभा माने. प्रा. मोरवे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .