धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील एकूण भौगोलिक परिस्थिती सौर आणि पवन उर्जा निर्मितीसाठी पूरक आहे. त्यामुळे या परिसरात सैर ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. त्यामुळेच अनेक प्रतिथयश कंपन्यांकडून या परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी जमिन विकत अथवा भाडे तत्वावर घेतली जात असताना शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी आपण कार्यप्रणाली बाबत एक प्रारूप तयार करून शासनाला पाठविणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत झालेल्या चर्चेनुसार धाराशिव जिल्ह्यात प्रथमतः पवन व सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधित जमीन व्यवहार व कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी सुयोग्य कार्यप्रणालीचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने आपण केलेल्या सूचनेनुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक, अपर पोलिस अधिक्षक आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकारणाचे अधिकारी व पवन उर्जा कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
विकास प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या व्यापक हिताला प्राधान्य ही आपली कार्यपद्धती आहे. शेतकरी बांधवांचे हित जोपासणे ही प्रशासनाची प्राथमिकता असायला हवी. जिल्ह्यात पवन उर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी व भाडे करार तसेच रस्त्याच्या अनुषंगाने झालेल्या व्यवहारातील अनियमितता व गैरप्रकार रोखण्यासाठी एक सुयोग्य पारदर्शक कार्यपद्धती निश्चित करणे आता आवश्यक झाले आहे. त्यामुळे या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा करून कार्यप्रणालीचे प्रारूप तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. सदरील प्रारूप शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्याद्वारे अंतिम कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. जमीनमालक, प्रकल्पधारक व शासनाचे विविध विभाग यांच्यामध्ये समन्वय ठेवून शेतकऱ्यांना न्याय व गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश करण्याचे आपण सूचित केले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात जवळपास 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश व ऊर्जा निर्मिती प्रकल्पास पूरक वातावरण आहे. त्यामुळे सौर उर्जा व पवन उर्जा प्रकल्प धाराशिव जिल्हा आणि परिसरात येत आहेत. पुढील काळात आणखीन मोठ्या प्रमाणात प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे एकूण कार्यपद्धतीत पारदर्शकता असणे अत्यावश्यक आहे. ती आणण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण रक्षण करण्यासाठी सुयोग्य कार्यप्रणालीचा अहवाल तयार करून पुढील आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.