नळदुर्ग (प्रतिनिधी)-  यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग येथील कुरनुर प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या दहा गावातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून रब्बीच्या आवर्तनास प्रारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीच्या पंधरवड्यात पाच गावातील क्षेत्र आणि त्यानंतर उर्वरीत पाच गावातील क्षेत्राला कुरनुर प्रकल्पातील पाणी मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

यावर्षी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या 125 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रकल्पाप्रमाणे नळदुर्ग येथील कुरनुर प्रकल्पही शंभर टक्के क्षमतेने भरला आहे. नळदुर्ग परिसरात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने फिरत असताना कुरनुर मध्यम प्रकल्पावरती अवलंबून असणाऱ्या विविध गावातील शेतकरी बांधवांनी रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांची गरज ध्यानात घेऊन शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे रब्बी आर्वतन सुरू केले आहे. कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावातील शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. वरील दहा गावातील 3 हजार 643 हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी असल्याने पूर्णक्षमतेने आवर्तन पूर्ण होण्यास विलंब होत होता. दुरूस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळतीही लागलेली आहे. त्यामुळे पाणी वितरणात अडथळे येत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत होता. त्यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


 
Top