परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण “कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा” असे केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व निविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आभार मानले आहेत.
याबाबत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सविस्तर माहिती देत म्हटले आहे की, कल्याण स्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य, योगी व समर्थांनी रचलेल्या “दासबोध” या ग्रंथाचे लेखनिक होते. कल्याण स्वामींची समाधी परंडा तालुक्यातील डोमगाव येथे असून तेथे समर्थ रामदास स्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला त्या “दासबोध” या कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील सोनेरी व रूपेरी शाईने लिहलेल्या हस्तलिखित ग्रंथाची मूळ आद्य प्रत आजतागायत आहे.
कल्याणस्वामींनी इसवी सन 1714 मध्ये परंडा येथे देह ठेवला. त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे सीना नदीकाठी करण्यात आले. सीना नदीचे कल्याणस्वामींनी श्रमहरणी असे नामकरण करून त्याची आरतीही रचली आहे. कल्याणस्वामींच्या समाधीस्थळी डोमगाव येथे सुंदर असे लाकडी श्रीराम मंदिर असून आता त्याठिकाणी सीना कोळेगाव हा मोठा सिंचन प्रकल्प झाला असून या प्रकल्पाच्या “कल्याणसागर” जलाशयात हे मंदिर आहे. हे खूप छान, शांत, निसर्गरम्य आणि प्रेक्षणिय स्थळ आहे.
कल्याणस्वामींनी 700 ओव्यांचे महावाक्य पंचीकरण हे प्रकरण आणि ध्रुवाख्यान(14), श्रीरामदास(8), रुक्मिणीस्वयंवर(हिंदी-34), श्रीशुकाख्यान(18), संतमाळा(10), सोलीवसुख(50अभंग) व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. याशिवाय, 5 श्लोक, 8 आरत्या, 97 पदे, 3 भूपाळ्या आणि 82 चौचरणी ओव्या रचल्या आहेत. असे एकंदर कल्याणस्वामींचे विपुल साहित्य आहे. अशा या महान अध्यात्मिक विभुतीचे नांव परंडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याबद्दल महाराष्ट्रातील महायुती शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मनःपूर्वक आभार ठाकूर यांनी मानले आहेत.