उमरगा (प्रतिनिधी)- शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या विरोधात बनावट जात प्रमाणपत्र असलेबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयामार्फत जात पडताळणी समिती धाराशिव व आमदार प्रविण स्वामी यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या व नुकत्याच पार पडलेल्या उमरगा विधानसभा मतदार संघात दोन्ही शिवसेनेमध्ये काट्याची टक्कर रंगली होती. प्रविण स्वामी यांना 96 हजार 206 मते मिळाली. तर ज्ञानराज चौगुले यांना 92 हजार 241 मते मिळाली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमदेवार प्रविण स्वामी यांनी अवघ्या 3 हजार 965 मताधिक्याने विजय मिळवला. अतिशय चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांना कमी मताने पराभवाला सामोरे जावे लागल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. यानंतर शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या संदर्भात प्रथमत: जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतू समितीने सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत सदर तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच या याचिकेसह निवडणूक लढविण्याच्या अनेक तांत्रिक आधरावरही ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रविण स्वामी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयामार्फत जात पडताळणी समिती धाराशिव व आमदार प्रविण स्वामी यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने ॲड. एस. एस. गंगाखेडकर हे काम पाहत आहेत.