धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वितरण क्षेत्र (आर. डी. एस. एस.), मागेल त्याला सोलार, पी. एम. कुसुम सोलार या तीनही योजनेच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी एक वाजता ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. या बैठकीला संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे ज्याना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे किंवा ज्याना या योजनेत प्रशासकीय अडचणी जाणवत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या बैठकीस हजर रहावे असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांच्या मागणीनुसार ही बैठक आयोजित केली असून सोमवारी दुपारी एक वाजता ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी मोठया संख्येनं हजर राहून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात असेही आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.