तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिर व परिसरात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी तेर येथे नागरिकांनी श्री. संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक रूपाली कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भगवान कालेश्वराच्या शिवपिंडीचे केमिकल कंजर्वेशन करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि तिथे काम करून घ्यावे. स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी दोन महिला किंवा पुरुषाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी. मंदिराकडे येणाऱ्या दोन मुख्य मार्गावर दोन मोठ्या कमानी बनवाव्यात. मंदिर परिसरामध्ये असलेल्या दुकानदारासाठी नवीन गाळे तयार होईपर्यंत योग्य ती अनामत रक्कम घेऊन भाडे तत्त्वावर तात्पुरते पत्र्याचे गाळे उपलब्ध करून द्यावेत. दोन सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी .मंदिरावर आर्थिक भार न पडू देता आपल्या प्रशासकीय यंत्रणेतून शौचालय सुरू करून त्याची व्यवस्था करावी. काकांच्या महाप्रसादासाठी तेर गावामध्ये पाटी घेऊन फिरणाऱ्या व्यक्ती ऐवजी एका स्वयंचलित रिक्षाचे व्यवस्था करावी व हे अन्नप्रसाद म्हणून येणाऱ्या भक्तांना दिले जावे. प्रत्येक एकादशीला ट्रॅफिक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था याची योग्य ते कायमस्वरूपी नियोजन करावे. पार्किंगची व्यवस्था करावी. प्रत्येक यात्रेला मंदिर परिसरामध्ये फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे. महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षाची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी श्री संत गोरोबाकाका व शिव मंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी रूपाली कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना तानाजी पिंपळे ,सचिन देवकते ,केशव सलगर, राजाभाऊ आंधळे व नागरिक उपस्थित होते.