भूम (प्रतिनिधी)- 243 परांडा विधानसभा क्षेत्रातील एकूण 2508 शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत ठिबक तुषार सिंचन योजना, यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा योजना एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (गळीत धान्य), कृषी यांत्रिकीकरण उपाभियान, राष्ट्रीय विकास योजना अशा विविध योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून एकूण 4, कोटी 74 लक्ष 59 हजार, 394 रुपये अनुदान थकीत आहे. यामुळे माजी आमदार राहुल मोटे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे ई-मेल द्वार आणि जिल्हा कृषी अधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन हे थकीत अनुदान लवकरात लवकर वाटप करण्याची मागणी केली आहे.
यामध्ये भूम तालुक्यातील 1377 शेतकऱ्यांचे 1 कोटी 83 लक्ष 51 हजार 822, परांडा तालुक्यातील 415 शेतकऱ्यांचे 1 कोटी 63 लक्ष 56 हजार रुपये आणि वाशी तालुक्यातील एकूण 718 शेतकऱ्यांचे 1 कोटी 27 लक्ष 51 हजार 572 रुपये असे एकूण 2508 शेतकऱ्यांचे 4 कोटी 74 लक्ष 59 हजार, 394 रुपये अनुदान थकीत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी हा सातत्याने विविध नैसर्गिक आपत्तीला तोंड देत तसेच अनेक अडचणीचा सामना करत शेती करत असतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेळीच शासकीय योजना किंवा शासकीय अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे असते. तरी 243 परांडा विधानसभा क्षेत्रातील या संबंधित सर्व शेतकऱ्यांचे सर्व अनुदान लवकरात लवकर त्यांना मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी या निवेदनात केली आहे.