भूम (प्रतिनिधी)- प्रत्येक समाजाला समता, बंधुता व मानवतेच्या विचाराची नितांत गरज आहे, युवकांनी या प्रवाहात सहभागी होणे काळाची गरज असल्याचे मत संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा' या समता वारीचे शहरात स्वागत प्रसंगी वारीच्या अध्यक्षा सौ अलका सपकाळ यांनी व्यक्त केले .
रविवार दि ५ जानेवारी २०२५ रोजी संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाउंडेशनच्या संयुक्त विद्य्यमान चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची, साधू संतांच्या विचाराची, हि वारी समता, बंधुता व मानवतेची शिदोरी घेऊन माढा ते देहू मार्गस्थ होत असताना या वारीचे भूम शहरात कोष्टी गल्ली भागातील श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहच्या ठिकाणी भव्य असे स्वागत करण्यात आले आहे . चोखोबा ते तुकोबा या वारीचे संस्थापक सचिन पाटील व वारीच्या संयोजन समिती अध्यक्ष साहित्यिक प्रा. सौ अलका सपकाळ यांच्या नेतृत्वात देहूकडे मार्गस्थ होत आहे . या वारीच्या संयोजन समितीचे सदस्य शंकर खामकर यांच्या माध्यमातून भूम शहरात नियोजन करण्यात आले .
‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची २०२५ 'चे यंदाचे ७ वे वर्ष आहे. ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथ गड, पाथर्डी, पैठण, जालना , सिंदखेडराजा , मेहुणाराजा , देउळगांवराजा , संभाजीनगर , नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. वारी राज्यातील ९ जिल्ह्यातून १७५० किलोमीटर प्रवास करणार आहे.
समता वारीच्या स्वागतावेळी कोष्टी समाज ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, पत्रकार संघ अध्यक्ष प्रल्हाद आडगळे, ज्येष्ठ समाज बांधव अंबादास वरवडे, पांडुरंग वरवडे, प्रकाश बागडे, आबासाहेब नवले , हनुमत उपरे , नारायण बोत्रे, नवनाथ रोकडे , शाम वारे, गंगाराम भागवत, अजित बागडे, योगेश आसलकर, सुहास खारगे, राजू उपरे, सागर टकलेसह शेकडो नागरिक उपस्थित होते .