धाराशिव (प्रतिनिधी)-  सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आलेले नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल पाहता, अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन खरेदीला 45 दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आपण पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

यंदाच्या खरिप हंगामात 4 लाख 62 हजार 872 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला रास्त हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सुरुवातीला हवामानातील बदलामुळे अपेक्षित आर्द्रता नसल्याने शेतकरी बांधवांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी विलंब झाला. मागील आठवडाभरापासून बहुतांश खरेदी केंद्रांना बारदान्याची चणचण भासत आहे. परिणामी काही केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया यामुळे ठप्प पडलेली आहे. जिल्ह्यात 32 हजार 009 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 5 हजार 338 शेतकऱ्यांच्या 1 लाख 33 हजार 227 क्विंटल सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर 14 हजार 541 शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून मेसेज गेलेले आहेत. 

मात्र खरेदीच्या मुदतीत अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुळात 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचेच सोयाबीन 12 जानेवारीपर्यंत खरेदी होऊ शकणार नाही. तर मग 6 जानेवारीपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कसे खरेदी होणार? असा प्रश्न उपस्थित करीत, नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या व बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला कल पाहता अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हमीभाव योजनेचा लाभ मिळावा यासाठी सोयाबीन खरेदीसाठी 45 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी. अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

 
Top