धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेच्यावतीने अध्यक्ष ॲड तुकाराम शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आले असून या प्राथमिक आरोग्य केंद्रास 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यात आले आहे. तसे आदेश महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालकांनी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.10 जानेवारी रोजी काढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे अध्यक्ष ॲड शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेच्यावतीने धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयांमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी दि.17 जुलै 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे  होती. याबाबत शासन निर्णय, सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर) मुंबई पत्र क्र.आरोसा/कक्ष-3/टे.2/न.क्र.92293/श्रे.व./ढोकी/प्रशाना/5567-69/23 दि.25.05.2023 यान्वये आदेश काढले आहेत. त्यानुसार तीस खतांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. 15 व्या वित्त आयोगांतर्गत 2024-25 मधील मंजूर नवीन उपकेंद्रे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन ग्रामीण रुग्णालय व  या कामांच्या पुढील कार्यवाही लवकरात लवकर कामे मार्गी लावून निधी खर्च होईल व कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी असे या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय झाले असून त्याचे बांधकाम लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या सोडविण्यास बऱ्यापैकी मोलाची मदत होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या ॲड. शिंदे यांचे या भागातील नागरिक आभार व्यक्त करीत आहेत.


 
Top