धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील समता नगर भागातील विसर्जन विहीर ते सुधीर अण्णा पाटील (डीआयसी रोडपर्यंत) या रस्त्याचे हॉट मिक्सचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी दि.16 जानेवारी रोजी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. मात्र, उपोषण सुरु करताच भेदरलेल्या नगर परिषद प्रशासनाने तात्काळ हे काम येत्या 24 तासांच्या आत सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन पत्राद्वारे दिले. त्यामुळे हे उपोषण माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव, नगर अभियंता वैजनाथ द्रुकर, संदीप दुबे आदी उपस्थित होते.
धाराशिव शहरातील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2022-23 अंतर्गत विविध विकास कामे करण्याच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आलेले होते. या कार्यारंभ आदेशांतर्गत अंतर्भूत कामे गुणवत्तापूर्वक व विहित मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर फक्त खड्डीचा मुलामा अंथरून गेल्या तीन महिन्यांपासून या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना मणक्याचे आजार व रस्त्यावरील फुपाट्यामुळे श्वसनाचे देखील आजार जडलेले आहेत. परंतू गेंड्याचे कातडे पांघरून घेतलेल्या ठेकेदार तसेच नगर परिषद विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सोयर-सुतक नसल्याने त्यांनी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू केले होते. याबाबत या भागातील नागरिकांनी नगर परिषद विभागाकडे वारंवार हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नाईलाजास्तव नाना घाटगे यांनी दि.16 जानेवारी रोजी पुष्पक मंगल कार्यालयाच्या बाजूच्या चौकामध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये समता नगरमधील जेष्ठ नागरिक, महिला व नागरिकांनी देखील या मोठा सहभाग नोंदविला. त्यामुळे भेदरलेल्या नगर परिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला उपोषण स्थळी दाखल केले. तर नगर परिषद व ठेकेदाराकडून येत्या 24 तासांच्या आतमध्ये या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. जर हे काम सुरू नाही केले तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा समता नगरवासियांनी दिला आहे. यावेळी पुष्पा झरकर, संजीवनी मोरे, मंगल काळे, मोहिनी पंडित, निर्मला इंगळे, विमल इंगळे, सुरेखा जगदाळे, सविता घाटगे, कैलास पानसे, पांडुरंग शेरखाने, हुसेन सय्यद, अय्युब शेख, हरिदास लोमटे, बंटी कादरी आदींसह समता नगरवासिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.