धाराशिव (प्रतिनिधी)- चारचाकी वाहन व तीन दुचाकीवरून वाहतूक केला जाणारा 81 किलो गांजा पोलिसांनी वाशी तालुक्यातील मांडवा शिवारात सापळा लावून पकडला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, चौघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत.
बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी धाराशिव, अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील काही व्यक्तींची एक टोळी गांजाच्या विक्रीत कार्यरत असून, ते मांडवा येथून जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्वांना एकत्रित पकडण्याकरिता मांडवा शिवारात सापळा लावला. पथकाने कारची तपासणी केली असता चार प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये उग्र वासाचा गांजा सापडला. सदर ठिकाणी उपस्थित सहापैकी दोघांना ताब्यात घेतले. इतर चार व्यक्ती अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. घटनास्थळावरून 16 लाख 29 हजार 760 रूपयांचा 81.488 किलो गांजा व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन, तीन दुचाकी असा एकूण 27 लाख 29 हजार 760 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे प्रसाद उर्फ विकी भागवत पवार (वय 22, रा. साळेगाव, ता. केज, हल्ली मुक्काम कळंब), गंगाराम उर्फ शेषराव रावसाहेब पवार (वय 36, रा. जामखेड) अशी आहेत. पोस्ट वाशीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संग्राम थोरात व पथकाच्या मदतीने पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे,नितीन भोसले तसेच पोलीस ठाणे वाशीचे पोलीस निरीक्षक थोरात, सपोनि सावंत व पथक यांच्या पथकाने केली आहे.