उमरगा (प्रतिनिधी)-भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी कै.तात्याराव मोरे यांच्या स्मरणार्थ श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शुक्रवारी 

दि.10 जानेवारी रोजी आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र पुर्व काळातील भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी कै. तात्याराव मोरे यांच्या स्मरणार्थ गेल्या 39 वर्षापासून दरवर्षी एका ज्वलंत विषयावर वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यामधील वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यात सामाजिक प्रश्नाची जाण व्हावी त्यांच्यातील विचार मंथनाला गती मिळावी या उद्देशाने संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्ष सन 1984 पासून दरवर्षी शिक्षण महर्षी तात्याराव मोरे आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा वादविवाद स्पर्धेचे 40 वे वर्ष असल्याने एका ज्वलंत विषयावर स्पर्धा घेण्यात येत आहे. एका बाजूला भारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्यात आलेले आहे. या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य गुण विकसित व्हावेत या उद्देशाने नवीन अभ्यासक्रमाची रचनाही करण्यात आलेली आहे. परंतु ज्यांच्यासाठी हे धोरण आहे त्या विद्यार्थ्यांची वर्गातील वाढती अनुपस्थिती हा सध्या चिंतेचा विषय आहे. याच विषयावर विचार मंथन करण्याच्या उद्देशाने तरुणाईलाच बोलते करण्यासाठी 'वर्गातील वाढती अनुपस्थिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मारक आहे/नाही' या विषयावर ही स्पर्धा होणार आहे. 

धाराशिव, लातूर, बीड व सोलापूर जिल्हयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी एका संघास सहभाग घेता येणार आहे. संघात दोन स्पर्धकाचा समावेश असेल, यातील एकाने विषयाच्या अनुकूल तर दुसऱ्याला प्रतिकूल बाजु मांडता येईल. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास दहा हजार एक रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय येणाऱ्या संघास सात हजार एक रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय संघास पाच हजार एक रुपये, याशिवाय कनिष्ठ महाविद्यालय संघासाठी उत्तेजनार्थ तीन हजार एक रुपये, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तरी स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ . संजय अस्वले आणि संयोजन समितीने केले आहे.     

 
Top