तुलजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता घटस्थापनेने  प्रारंभ झाला. महोत्सव काळात विवि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

31 डिसेंबर रोजी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा 7 जानेवारी रोजी पहाटे संपून देवी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीला पंचामृत अभिषेक करुन वस्त्रालंकार घालण्यात आले. नैवेद्य, धुपारती, अंगारा काढून दुपारी 12 वाजता मंदिरातील गणेश ओवरीमध्ये यजमान प्रा. विवेक गंगणे व त्यांच्या पत्नी प्रियंका गंगणे, पाळीचे पुजारी राजेश मलबा, महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी  धार्मिक सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, जयसिंग पाटील, विश्वास परमेश्वर, पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, धनंजय लोंढे, अतुल मलबा, किशोर गंगणे, कुमार इंगळे, शिरीष कुलकर्णी, प्रतिपचंद्र प्रयाग, शिवाजी बोदले, प्रवीण कदम  यांच्यसह सेवेदार पुजारी उपस्थित होते. 

शाकंभरी नवरात्र महोत्सवाला धाकटा दसरा म्हणूनही संबोधले जाते. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथे भाविकांची गर्दी होणार आहे. मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव पौष पौर्णिमा 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यादिवशी शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटोत्थापनाने सांगता होणार आहे.

 
Top