तुळजापूर (प्रतिनिधी)- धड नांदता येईना,डोरलं गळ्यात टांगता येईना, म्होतुराची असल्यामुळे, पोराला पालक सांगता येईना. असे म्हणत प्राप्त राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ कवी फुटाणे यांनी जोरदार प्रहार येथील  कविसंमेलनात केला.तुळजापुरातील रसिक श्रोत्यांनीही त्याला उसळून दाद दिली. सलग दोन तास विविध कवितांच्या माध्यमातून अनोखा राजकीय कलगीतुरा तुळजापूरकरांना अनुभवायला मिळाला.

येथील स्कायलॅन्ड हॉटेल परिसरात स्व. आमदार साहेबराव हंगरगेकर फाऊंडेशन, तुळजापूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार तथा ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे यांच्यासह भरत दौंडकर (शिक्रापूर), शशिकांत तिरोडकर (कोकण), नारायण पुरी, युनुस नदाफ, (संभाजीनगर) डी. के. शेख, भाग्यश्री केसकर, अरविंद हंगरगेकर (

धाराशिव), दास पाटील, विजय देशमुख, देविदास सौदागर (तुळजापूर) आदी कवींची यावेळी उपस्थिती होती. तत्पूर्वी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांना माजी आमदार साहेबराव हंगेरगेकर यांच्या स्मरणार्थ साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

झालं स्वतंत्र म्हातारं, 

देश हा आला डबघाईवर

हाताला इंडियाचा आधार,

कमळदल हसते खुदूखुदू फार

घड्याळी लंबक हा बेजार जी रं...जी..जी 

अशा परखड शब्दात छत्रपती संभाजी नगर येथील कवी नारायण पुरी यांनी पोवाडा सादर केला आणि तुळजापुरातील रसिक श्रोत्यांनीही त्याला उसळून दाद दिली. सलग दोन तास विविध कवितांच्या माध्यमातून अनोखा राजकीय कलगीतुरा तुळजापूरकरांना अनुभवायला मिळाला.

तुळजापूर येथील कवी तथा गझलकार विजय देशमुख यांच्या खालील शेराला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.

माथ्यात जात ठेवून मिरवू नका शिवाजी

बाजी, जिवा, मदारी म्हणतील घात केला

देशमुख यांनी त्यानंतर सादर केलेल्या गाभूळल्या चिंचेची कविताही अनेकांच्या पसंतीस उतरली. डी. के. शेख यांच्या ए राजकारण करतोस काय? या राज्यभर गाजलेल्या कवितेला तुळजापुरातील रसिकांनाही वाहवाच्या सुरात मोठी दाद दिली. भाग्यश्री केसकर यांनी सादर केलेल्या गेय कवितेच्या लयीत श्रोते मंत्रमुग्ध झाले होते तर प्रा. अरविंद हंगरगेकर यांनी दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांची व्यथा आपल्या कवितेतून सादर करीत उपस्थितांना भावुक करून सोडले.

दंगल घेऊन आलेल्या पिढ्यांनी 

आम्हाला जन्म दिला 

दंगलीचा वारस समजून,

म्हणूनच की काय?

दंगलीचं भोईपद आपसूकच

आमच्या खांद्यावर येऊन पडलं. अशा शब्दात कवी युनूस नदाफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी देविदास सौदागर यांच्या कवितेलाही रसिकांनी दाद दिली. दास पाटील यांनी सादर केलेली गझल भाव खाऊन गेली. तिरोडकर यांच्या कोकणी कवितेलाही चांगली वाहवा मिळाली. शेवटी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी कधी हास्यकविता तर कधी गंभीर भाष्य करीत उपस्थितांच्या काळजाला हात घातला.

तुळजापुरातील रसिक श्रोत्यांनीही त्याला उसळून दाद दिली. सलग दोन तास विविध कवितांच्या माध्यमातून अनोखा राजकीय कलगीतुरा तुळजापूरकरांना अनुभवायला मिळाला. यावेळी तुळजापूर येथील कवी दास पाटील यांच्या उन्हाच्या झळांचे विवेचन या पहिल्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, शाहीर नरहरी गायकवाड, रंगनाथ हंगरगेकर, राजेंद्र हंगरगेकर, दीपक हंगरगेकर, प्रदीप हंगरगेकर आणि मसाचे अध्यक्ष अमर हंगरगेकर आदींची उपस्थित होती.

 
Top